आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा! आज संपूर्ण जगभरात महिलांचे सामर्थ्य आणि सौंदर्य याचा उत्सव साजरा केला जातो. मात्र सगळं जग महिलांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा सन्मान करत असताना, आपण थोडा वेळ स्वतःवर लक्ष केंद्रित करूया.
इतरांना प्रेम देतानाच स्वतःवर थोडं प्रेम करूया. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे सगळ्यात आधी आपण जे जसे आहोत, आपले गुण दोष यासह स्वीकारुया. जितक्या प्रेम आणि आदराने इतरांशी वागतो तितक्याच प्रेमाने स्वतःशी वागुया. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता, तेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या गरजांना प्राधान्य देण्याची आणि तुमच्या मानसिक, भावनिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेण्याची परवानगी स्वतःला देता. परफेक्ट होण्याच्या नादात, सगळच मिळवण्याचा अट्टाहास करत, आपलं कुटुंब, संसार, नातेवाईक आणि अशा असंख्य गोष्टीना प्राधान्य देताना अनेकदा त्या priority list मध्ये आपला नंबर लागतच नाही. पण खरी गोष्ट अशी की आपलं भांडं रिकामं असेल तर आपण दुसऱ्याच्या कपात काही ओतू शकत नाही.
त्यामुळे आपण प्रथम स्वतःवर प्रेम करायला आणि आपली काळजी घ्यायला शिकले पाहिजे, जेणेकरून आपण आपलं जीवन भरभरून जगू शकू. म्हणून या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त स्वतःवर प्रेम करायचा संकल्प करूया.
तुम्हाला आनंद देणार्या गोष्टी करण्यासाठी वेळ काढा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही चुका कराल तेव्हा स्वतःला माफ करायला शिका. आपण बायका क्षमाशील असतो असं म्हणतात पण ते दुसऱ्यांच्या बाबतीत. जेव्हा आपल्या हातून एखादी चूक होते तेव्हा मात्र आपण इतकं कुढत बसतो, की स्वतःला माफ करू शकत नाही. लक्षात ठेवा, तुम्ही जशा आहात तशा तुम्ही प्रेम आणि आदरासाठी पात्र आहात.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा!
Comments
Post a Comment