मग मनाची शांतता आणि आपल्या सौंदर्याचं काही कनेक्शन आहे का? आपलं मन काही काळजी करीत असेल तर आपली त्वचा लगेच परिणाम दाखवते असं आधुनिक संशोधन सांगतं. ताण तणावामुळे आपल्या त्वचेवर सुरकुत्या वाढतात, चेहऱ्यावर पिंपल्स व डोळ्याखाली डार्क सर्कल्स येतात.
त्यामुळे जर सुंदर दिसायचं असेल तर नुसते बाह्य उपचार करण्यापेक्षा आपलं अंतरंगही निरोगी ठेवूया. आता नेमकं काय केलं म्हणजे मन निरोगी राहील आणि आपलं व्यक्तिमत्त्व ही खुलून दिसेल.
१. स्वतःसाठी वेळ काढा.
दिवसभर आपण अनेक कामात इतके गुंतून जातो की, स्वतःसाठी वेळ काढणं ही सुद्धा आपल्याला लक्झरी वाटायला लागते. पण आपल्या रोजच्या धावपळीतून मनाला ताजंतवानं ठेवायचं असेल, तर आपण वेळेचं योग्य नियोजन करून आपल्या मनाच्या स्वास्थ्यासाठी वेळ राखून ठेवायलाच हवा. या वेळेत तुम्ही तुमच्या आवडीचा व्यायाम करू शकता, फिरायला जाऊ शकता, एखादं पुस्तक वाचू शकता किंवा ध्यानधारणा करू शकता.
२. चांगल्या लोकांच्या सहवासात रहा.
आपल्या अवतीभवती वावरणाऱ्या लोकांच्या मानसिकतेचा ही आपल्या मनावर परिणाम होतो. बऱ्याचदा कामाच्या ठिकाणी किंवा घराच्या आजूबाजूला नकारात्मक मानसिकतेचे लोक असतातच. सकारात्मक मानसिकता असणारे लोक मात्र जाणीवपूर्वक शोधावे लागतात. जे आपल्याला आनंदी ठेवतील ज्यांच्याशी आपण आपली सुख दुःख मोकळेपणी शेअर करू शकतो असे, मित्र मैत्रिणी नातेवाईक गुरू शोधणे आणि त्यांच्या सहवासात राहण्याने आपलं मन आनंदी राहतं.
३. आपल्या त्वचेची निगा राखा.
जसं मनावरच्या ताण तणावाचा त्वचेच्या आरोग्यावर परिणाम होतो, त्याच्या उलट आपल्या दिसण्याचा परिणाम आपल्या आत्मविश्वासावर होतो. त्यामुळे सुंदर व टवटवीत त्वचा असेल तर आपला आत्मविश्वास वाढतो. त्वचेची योग्य काळजी घेतल्याने त्वचेचा पोत सुधारतो. त्यासाठी नियमित स्वच्छता, उत्तम प्रतीचे स्कीन केअर प्रोडक्ट्स वापरणे, रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करणे, पुरेशी झोप घेणे या गोष्टी कराव्यात.
शेवटी काय आपला चेहरा म्हणजे आपल्या अंतरंगाचा आरसा. त्यामुळे आरशात प्रतिमा सुंदर दिसायला हवी असेल तर अंतरंग ही सुंदर हवं. खरं ना...
Comments
Post a Comment